किसन कांबळे सर 9970381507
राज्यातील शिक्षकांना शासनाने ड्रेस कोड लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचा विरोध असल्याची माहिती राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की, राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसे परिपत्रक १५ मार्च रोजी काढले आहे. मात्र हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर आर्थिक बोजा टाकण्याचा आणि शिक्षकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे हनन करणारा आहे.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी मेल करून पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या या परिपत्रकानुसार शिक्षकांना शाळा व्यवस्थापन ठरवेल तो पेहराव यापुढे करावा लागणार आहे. तसेच हा पेहराव स्वतःच उपलब्ध करून घ्यावा लागेल. एकाहून अधिक पेहराव घेताना शिक्षकांना आर्थिक भुर्दंड बसेल.
अंशतः अनुदानित किंवा नाममात्र वेतन देणार्या शाळेतील शिक्षकांना पेहराव देण्याची कोणताही जबाबदारी सरकार घेणार नसल्यामुळे शिक्षकांवर पोशाखांचा अतिरिक्त खर्च पडणार आहे. शिक्षकांच्या पेहरावाबाबत राज्य शासनाचा हा आदेश म्हणजे शिक्षकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे हनन करणारा आहे.
खासगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली १९८१ व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ आणि नियम २०११ मधील तरतुदींचा भंग करणारा आहे. त्यामुळे १५ मार्च रोजीचे पत्रक महाराष्ट्र सरकारने रद्द करावे किंवा सैन्य दल , हवाई दल गृह विभागाचे अधिकारी , कर्मचाऱ्यांप्रमाणे केंद्र प्रमुख ते राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत सर्वांना समान ड्रेस कोड लागू करावा. त्यासाठी मासिक गणवेश भत्ताही देण्यात यावा अशी मागणी राजाचे मुख्यमंत्री , शालेय शिक्षण मंत्री व ग्रामविकास मंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे, ज्येष्ठ राज्य उपाध्यक्ष दादासाहेब साळवे ,राज्य प्रवक्ते विनोद चव्हाण, राज्यसल्लागार दिगंबर काळे, राज्य संघटक पौर्णिमा रणपिसे, जिल्हा महासचिव मिलिंद देडगे व सुरज कांबळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे, मुळशीचे अध्यक्ष दशरथ गावडे, बारामतीचे अध्यक्ष विनोदकुमार भिसे ,इंदापूरचे अध्यक्ष सुहास मोरे , दौंड तालुका अध्यक्ष गोविंद जाधव इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .
